Advertisement Advertisement

फटाक्यांवरून गावात राडा; दोन गटांत हाणामारी, परस्पर गुन्हे दाखल…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): भारत-न्यूझीलंड अंतिम सामना पाहताना फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घारोड येथे घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्यात आल्याने हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये परस्परांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.


रामकृष्ण महादेव दुतोंडे (वय ४०) हे ८ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घरासमोर मोबाईलवर भारत-न्यूझीलंडचा अंतिम सामना पाहत होते. भारत जिंकल्याच्या आनंदात त्यांनी फटाके फोडले. याच कारणावरून अल्ताफ शहा रफिक शहा, तौसिफ शहा रफिक शहा, आसिफ शहा रजाक शहा व रफिक शहा गुलाब शहा यांनी वाद घालत अंगावर धावून येत लोखंडी कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर वार करून जखमी केल्याची तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने तौसिफ शहा रफिक शहा (वय २५) यांनीही तक्रार दिली आहे.

फटाक्यांच्या आवाजामुळे त्यांच्या लहान मुलीला त्रास होत असल्याने फटाके फोडू नका असे सांगितल्यावरून वाद वाढला. त्यावेळी गोपाल वसंता दुतोंडे, गणेश वसंता दुतोंडे, एकनाथ दुतोंडे व रामकृष्ण दुतोंडे यांनी लोखंडी पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!