Advertisement Advertisement

डोणगावच्या दोन दोस्तांची जोडी कायमची तुटली; कंटेनरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर नागापूरसमोरील पुलाजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने डोणगाव येथील दोन तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने डोणगाव परिसरावर शोककळा पसरली असून, दोन्ही मित्रांवर ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेदोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी असंख्य नागरिकांची गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख साहिल शेख जफर आणि शेख शाकिब शेख शकील कुरेशी, दोघेही रा. लक्ष्मीनगर, डोणगाव, हे मित्र मोटारसायकल क्रमांक टीएन ०१ ईजी १४७६ वरून मेहकरकडे जात होते. दरम्यान, नागापूरसमोरील पुलाजवळ काही कारणास्तव त्यांची दुचाकी थांबलेली असताना मेहकरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एनएल ०१ एससी ३९८२ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुण दुचाकीसह रस्त्याच्या खाली फेकले गेले. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यावेळी मेहकरकडून डोणगावकडे येणारे अमोल धोटे व त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी तरुणांना रस्त्याच्या खालील भागातून बाहेर काढून मदत केली.

अपघाताची माहिती मिळताच १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. तसेच घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अपघातात दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.

दरम्यान, कंटेनर चालकाने डोणगाव पोलिस ठाण्यात हजेरी लावल्याची माहिती आहे. या अपघाताची पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

अंत्यविधीला जनसागर….

शेख साहिल आणि शेख शाकिब हे दोघे मित्र असल्याने त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी डोणगावात वाऱ्यासारखी पसरली. ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेदोन वाजता दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळी तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. दोन मित्रांचा एकाच अपघातात झालेला दुर्दैवी अंत पाहून उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!