बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यासह जिल्ह्यात निर्माण झालेल्या डिझेल व गॅस टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीची कामे खोळंबण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने तातडीने डिझेलचा पुरेसा पुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच ट्रॅक्टर मालक आणि शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल व पेट्रोल देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात तुपकर यांनी म्हटले आहे की, खरीप हंगामाची तयारी सुरू असताना ट्रॅक्टर, पंप, फवारणी यंत्रे तसेच शेतीतील विविध अवजारांसाठी डिझेल अत्यावश्यक असते. मात्र सध्या अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून काही ठिकाणी मर्यादित प्रमाणातच डिझेल दिले जात आहे. अनेक पंप चालकांकडून कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
या टंचाईमुळे नांगरणी, मशागत, पेरणी, फवारणी यांसारखी महत्त्वाची शेतीकामे वेळेत होत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. आधीच अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकटे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी अडचणीत असताना इंधन टंचाईमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनल्याचे तुपकर यांनी नमूद केले.
जर वेळेत डिझेल उपलब्ध झाले नाही तर खरीप हंगामावर विपरीत परिणाम होऊन पेरण्या खोळंबण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून जिल्ह्यासह राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे.













