खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दारूच्या नशेत झालेल्या वादातून सख्ख्या भावाने भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना ५ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास नागोबा मंदिराजवळील परिसरात घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देविदास महादेव गायकी (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी आई लीला महादेव गायकी (वय ४३, रा. नागोबा मंदिराजवळ, सुटाळा बुद्रुक, ता. खामगाव) यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी सख्खा भाऊ मंगेश महादेव गायकी (वय २५) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक देविदास गायकी हा मित्रासोबत दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी आरोपी मंगेश गायकी याने मृतकाच्या मित्राला घरी जाण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत जाऊन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात देविदासने हातातील कड्याने मंगेशच्या डोक्यात मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात मंगेशने घरातून भाजी कापण्याचा चाकू आणून देविदासच्या डाव्या कुशीमध्ये व पोटात वार केले. या हल्ल्यात देविदास गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ६ मार्च रोजी पहाटे ५.१२ वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने सुटाळा बुद्रुक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.














