Advertisement Advertisement

सामाईक बांधावरच्या झाडावरून राडा; बांधावरचं झाड ठरलं भांडणाचं कारण; शेतकऱ्याला कुऱ्हाडीचा घाव, पोलिसांत गुन्हा…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सिनगाव पांगरी परिसरातील पांगरी शिवारात सामाईक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात शंकर कोंडीबा वाघ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, अंकुश ज्ञानदेव वाघ (वय ५०, रा. सिनगाव पांगरी) आणि शंकर कोंडीबा वाघ (रा. सिनगाव पांगरी) यांची शेती शेजारीशेजारी आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शंकर वाघ हा दोघांच्या सामाईक बांधावरील झाड तोडत असल्याचे अंकुश वाघ यांच्या निदर्शनास आले.

अंकुश वाघ यांनी शंकर वाघ याला झाड का तोडत आहात, अशी विचारणा केली. यावेळी संबंधित झाड आपल्या बांधावर असल्याचे सांगत शंकर वाघ याने त्यांच्याशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या वादातून शंकर वाघ याने अंकुश वाघ यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे.

याशिवाय, फिर्यादीच्या पत्नी व मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेप्रकरणी अंकुश ज्ञानदेव वाघ यांच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी शंकर कोंडीबा वाघ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!