Advertisement Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘क्रांतिकारी’चा दणक्यात हल्लाबोल! “हेक्टरी १ लाख मदत द्या, आमदार-खासदारांचे पगार थांबवा, मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही”; रविकांत तुपकरांचा एल्गार, करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या गेटवर उधळल्या; पोलिसांचा बळाचा वापर, तुपकरांसह आंदोलकांना ताब्यात घेतले!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्या, सरसकट कर्जमाफी करा, अशा मागण्यांसाठी आज, २८ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाने परिसर दणाणून सोडला. डफडे वाजवत, सरकारविरोधी घोषणा देत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार हल्लाबोल केला. करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उधळून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा संताप व्यक्त करण्यात आला. “आमदार-खासदार, सचिव कलेक्टरांचे पगार थांबवा,आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा. अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी मांडली.

डफडे वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी; करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या गेटवर उधळल्या!

रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, आंदोलकांनी डफडे वाजवत आणि सरकारविरोधी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांच्या हातात हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या, सरसकट कर्जमाफी करा, अशा मागण्यांचे फलक होते. करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उधळून शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

‘सरकारची आश्वासने फालतू आणि तकलादू’; दुष्काळी जीआरच्या प्रती फाडल्या!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी जीआरवर रविकांत तुपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “सरकारची आश्वासने फालतू आणि तकलादू आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी असे फालतू जीआर काढू नका,” अशी टीका त्यांनी केली. यावेळी शासनाच्या दुष्काळी जीआरच्या प्रती फाडून निषेध नोंदवण्यात आला. सोयाबीन उत्पादनासाठी हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला असून, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

‘पंचनाम्याचे नाटक नको’; सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना २ लाख रुपये द्या!

शेतकऱ्यांचे नुकसान स्पष्टपणे दिसत असताना पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा करू नये, अशी भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे आणि नव्याने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. केवळ आश्वासने नकोत, तर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करा, असा आग्रह आंदोलकांनी धरला.

‘आमदार-खासदारांचे पगार थांबवा,मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही!’

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने आपल्या खर्चाच्या प्राधान्यक्रमात बदल करावा, अशी आक्रमक भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली. राज्यातील मोठे प्रकल्प काही काळ थांबवून त्यांचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा. आमदार-खासदारांचे पगार थांबवा आणि हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हटण्यास नकार; पोलिसांचा बळाचा वापर, तुपकरांसह आंदोलकांना ताब्यात घेतले!

आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हटण्यास तयार नव्हते. आंदोलन अधिक तीव्र होत असतानाच पोलिसांनी बळाचा वापर करून रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी वाहनांमध्ये बसवून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेले. भाषण करण्याआधीच तुपकर यांना ताब्यात घेण्यात आल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली. सध्या रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

‘अभी तो ट्रेलर है’; ३० सप्टेंबरला हिंगोलीत मोर्चा

आजचे आंदोलन हा केवळ ट्रेलर असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला. ३० सप्टेंबर रोजी हिंगोली येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चातून महाराष्ट्रव्यापी मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सगळ्या मोर्चांचे रेकॉर्ड मोडणारा मोर्चा काढून बळीराजाची ताकद दाखवू , असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनातं ‘क्रांतिकारी’ चे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल राऊत, अक्षय पाटील, अमोल मोरे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष दासा पाटील, नरहरी थुट्टे, बंडू शेळके, ‘क्रांतिकारी ‘चे राजेश शेळके, गजानन भोपळे, सचिन शिंगोटे, सहदेव लाड, भागवत धोरण, वसीम शेख, अरुण नेमाने, सुधाकर तायडे, भारत वाघमारे, मधुकर शिगणे, ॲड. प्रवीण सुरडकर, भारत गाढवे, किसन नागरे, भगवान मोरे, रामेश्वर आंभोरे, आकाश माळोदे, नितीन सोनटक्के, शुरेश खरात, गजानन डिघोळे, उमेश राजपूत, बाळासाहेब यसकर , अजय गायकवाड, गजानन नाईकवाडे, कृष्णा डोईफोडे, विठ्ठल खेडेकर, आकाश धंदर, समाधान नागवे, गजानन बाप्पू देशमुख, कैलास देशमुख, निलेश राजपूत, अनिल पडोळ, अविनाश डुकरे, निलेश गवळी, प्रमोद पाटील, विनोद सरोदे, सुरेश चोधरी, संतोष शेळके, सतिष सुरडकर, गजानन कुटे, आदित्य धाडे, जगन्नाथ लोखंडे, संदीप असाबे, कैलास उतपुरे, दिपक पाटील, नंदू बाहेकर, सचिन कुटे, अरबाज खान, शिवदास खिरोडकार, प्रफुल देशमुख, मारोती मेढे, कडुबा मोरे, संदीप तायडे, मोहम्मद मकसूद, आत्माराम ठाकरे, वैभव जाणे, सिद्देश्वर चेके, एकनाथ वाघ, सदाशिव जाधव, संदीप पवार, राहुल शेलार, निलेश धोंडगे, देवकाबाई उतपुरे, नंदाबाई जेऊघाले, पंचफुलाबाई, मुरलीधर जेऊघाले, अरुण पन्हाळकर, शैलेश कल्याणकर, सोनोसिंग इंगळे, असलम शेख, दिलीप बोबडे, दीपक पाटील, दिलीप राजपूत, मोहन वेरूळकर, नितीन शिंदे, दीपक देशमुख, श्रीकृष्ण काकडे, नानाभाऊ खटके, शंकर बापू देशमुख, अनंता भाऊ आटोळे, शुभम राऊत यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!