खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाची प्रतीक्षा कायम असताना खामगावकरांना मात्र उन्हाच्या चटक्यासह उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यानंतर सप्टेंबरचे तीन आठवडे उलटूनही दमदार पाऊस झालेला नाही. आकाशात अधूनमधून ढग दाटत असले तरी पावसाऐवजी उन्हाचा चटका जाणवत असल्याने सप्टेंबरमध्येच नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून खामगावचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास कायम आहे. मागील आठवड्यात तापमानात सातत्याने वाढ झाली असून, दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यातच हवेत असलेल्या दमटपणामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवत आहे. विशेषतः दुपारच्या वेळी रस्त्यांवर उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळा संपत आला; भूजलपातळीची चिंता….
ऑगस्टपासून दमदार पाऊस झालेला नसल्याने पावसाळ्याचा कालावधी संपत येताना भूजलपातळीबाबतही चिंता वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता उकाड्याचा सामना करावा लागत असून, पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यास त्याचा परिणाम खरीप पिकांच्या वाढीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दमट हवेमुळे उकाड्यात आणखी भर….
ढगाळ वातावरण दिसत असले तरी पावसाचा अभाव आणि हवेतील दमटपणामुळे वातावरण अधिक कोंदट जाणवत आहे. त्यामुळे सकाळपासूनच घामाच्या धारा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप यांसारख्या हंगामी आजारांचीही शक्यता वाढली आहे.
पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता…..
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत उकाड्यापासून तातडीने सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एखादी पावसाची सर झाल्यास तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र, पाऊस लांबल्यास तापमानात आणखी एक ते दोन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खामगावकरांना सध्या पावसाची प्रतीक्षा करतानाच उन्हाच्या चटक्याचाही सामना करावा लागत आहे.















