Advertisement Advertisement

गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेले; फायनान्स कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेलेल्या वित्त कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरसह त्यांच्या सहकाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना राजूर येथे २५ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी २६ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी चिखली तालुक्यातील चांधई येथील दीपक भगवान तेलंग्रे यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली. तेलंग्रे हे बुलढाणा येथील वास्तू फायनान्स कंपनीत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे गृहकर्जाच्या थकीत हप्त्यांची वसुली करण्याची जबाबदारी आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, राजूर येथील वैभव किशोर राऊत यांनी संबंधित वित्त कंपनीकडून गृहकर्ज घेतले असून त्यांचा हप्ता थकीत होता. त्यामुळे तेलंग्रे हे २५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता आपल्या सहकाऱ्यासह थकीत हप्ता वसूल करण्यासाठी राऊत यांच्या घरी गेले होते.

यावेळी राऊत यांनी दोघांना घरात बोलावून घेतल्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर तेलंग्रे यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वैभव किशोर राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!