डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): यंदाच्या दुष्काळी परिस्थितीसह मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या नापिकीमुळे भोसा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दगडू कोंडू शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे भोसा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दगडू शिंदे हे काही दिवसांपूर्वी पाहुण्यांकडे जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. बराच वेळ उलटूनही ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक तसेच परिसरातही त्यांचा शोध घेण्यात आला.
दरम्यान, चार ते पाच दिवसांनंतर गावातील काही शेतकरी शेताकडे गेले असता महादेव तायडे यांच्या विहिरीजवळ दुर्गंधी जाणवली. संशय आल्याने विहिरीत पाहणी केली असता दगडू शिंदे यांचा मृतदेह पाण्यावर आढळून आला. त्यानंतर घटनेची माहिती संबंधितांना देण्यात आली.
यंदा पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि यापूर्वीच्या सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दगडू शिंदे यांच्या मृत्यूने शेतकरी कुटुंबांवरील वाढत्या संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.













