मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत धक्कादायक व हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मेहनत करणाऱ्या एका तरुण क्रेन ऑपरेटरने क्रेनलाच गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या हातावर लिहिलेला संदेश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘मेरी माँ और बच्चों का खयाल रखना’ असे लिहून सलमान खान अमीर खान पठाण या तरुणाने जगाचा निरोप घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथील रहिवासी असलेले सलमान खान हे क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होते. गेल्या ५-६ दिवसांपासून ते मोताळा तालुक्यातील गोसिंग गावात एका शेतातील विहिरीच्या कामावर हायड्रा क्रेन चालवत होते. मात्र १६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांनी क्रेनलाच लटकून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शारीरिक व्याधी असतानाही ते काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ही केवळ आत्महत्या नसून यामागे काहीतरी वेगळे कारण असावे, असा संशय मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी सलमान यांचे चुलत भाऊ जाबीर खान दिलावर खान पठाण यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुपडासिंग चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.













