Advertisement Advertisement

घरासमोर उभी कार पेट्रोल टाकून पेटवली; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे दोन लाखांचे नुकसान…

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील तिरुपतीनगर-खुदावंतपूर परिसरात घरासमोर उभी असलेली कार अज्ञात इसमाने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास देविदास हिंगणे यांच्या वापरातील कार जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंबादास हिंगणे हे घरगुती कामासाठी त्याच परिसरात राहणारे त्यांचे नातेवाईक विठ्ठल मुकुंदा भगत यांची निळ्या रंगाची एमएच ४६ एक्स २०३४ क्रमांकाची स्विफ्ट कार वापरत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी ही कार आपल्या घरासमोरील रस्त्यावर उभी केली होती.

दरम्यान, मुलीच्या इंटरव्ह्यूसाठी अंबादास हिंगणे हे मुलीसह तीन-चार दिवसांपूर्वी पुण्याला गेले होते. त्यांची पत्नी संगीता हिंगणे या घरी होत्या. २० ऑगस्टच्या रात्री अज्ञात व्यक्तीने कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली आणि स्कूटीवरून घटनास्थळावरून पसार झाला. आरोपीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ टी-शर्ट असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने अंबादास हिंगणे यांना रात्री सुमारास दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबादास हिंगणे हे पुण्यावरून नांदुराकडे रवाना झाले. ते रात्री सुमारे तीन वाजता घरी पोहोचल्यानंतर त्यांनी जळालेली कार पाहिली आणि या घटनेची तक्रार पोलिसांत दाखल केली.

कार खोडसाळपणे पेटवून आपले आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप हिंगणे यांनी तक्रारीत केला असून, या घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३२६ (f) BNS अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कार पेटविण्यामागील नेमका उद्देश काय होता, तसेच या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. संदीप सोळंके करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!