चिखली (प्रतिनिधी): (महेश म्हस्के पाटील )
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गांगलगाव येथे निसर्गाच्या एका भीषण तडाख्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे केलेले स्वप्न अक्षरशः कोसळले. दिनांक १ जून २०२६ रोजी रात्री अचानक सुटलेल्या सुसाट वादळी वाऱ्याने परिसरातील काढणीस आलेल्या केळीच्या बागांचा अक्षरशः चुराडा केला. काही क्षणांतच हिरवीगार, डौलाने उभी असलेली केळीची झाडे जमिनीवर आडवी झाली आणि शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षाही त्यासोबत कोसळल्या.
गेल्या अनेक महिन्यांपासून उन्हातान्हात राबत, कर्ज काढून, लाखो रुपयांची गुंतवणूक करून शेतकऱ्यांनी केळीची बाग फुलवली होती. काढणीचे दिवस जवळ आले होते. घरातील आर्थिक संकट दूर होईल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेल, घेतलेले कर्ज फेडता येईल, अशी आशा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात होती. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते.
सोमवारी रात्री निसर्गाने अचानक रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या काही मिनिटांत शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. पहाटे शेतात पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. जमिनीवर पडलेली केळीची झाडे पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. काही शेतकरी तर शेतातच हतबल होऊन बसले.
“आम्ही दिवस-रात्र कष्ट करून ही बाग उभी केली होती. काढणीच्या अगदी तोंडावर आलेले पीक एका रात्रीत संपले. आता कर्ज कसे फेडायचे, घर कसे चालवायचे?” असा वेदनादायी सवाल नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.
शासनाकडे मदतीची आर्त हाक
वादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या गांगलगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आज पुन्हा एकदा गांगलगावातील शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि उद्ध्वस्त झालेल्या बागा शासनाच्या संवेदनशीलतेची वाट पाहत आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेणाऱ्या या वादळाने गांगलगावच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर आणखी एक खोल घाव उमटवला आहे.
बुलढाणा: एका रात्रीत उद्ध्वस्त झाली कष्टाची कमाई; गांगलगावातील केळीच्या बागा वादळाने केल्या जमीनदोस्त!
by Admin
Published On: June 2, 2026 12:25 pm















