सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): कायद्याने मुलीच्या लग्नाचे वय किमान १८ वर्षे असतानाही अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रकार उघडकीस आला असून, सिंदखेड राजा पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. कुंबेफळ येथील संत श्री सेवालाल महाराज मंदिरात सुरू असलेला बालविवाह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वाडेगाव येथील १६ वर्षे ३ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह डोंगरखंडाळा येथील लक्ष्मण विजय पवार याच्यासोबत २ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी कुंबेफळ येथे पार पडत होता. याची माहिती मिळताच ग्रामपंचायत अधिकारी अमित राम जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व मुलीची कागदपत्रे तपासली. मुलीची जन्मतारीख १२ सप्टेंबर २००९ असल्याचे आढळून आल्याने ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर त्यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बालविवाह थांबवला.
या प्रकरणी नवरदेव लक्ष्मण विजय पवार, त्याचे आई-वडील, नातेवाईकांसह एकूण ७ नामजद आणि लग्नास उपस्थित असलेल्या इतर १० ते २० जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कलम ९, ११ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अरुण मोहिते करीत आहेत.पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.













