Advertisement Advertisement

शेताच्या बांधावरून भांडण तापलं; मोजणीच्या खुणा उपटण्यावरून शिवीगाळ-धक्काबुक्की, दोन्ही बाजूंनी तक्रारी…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेताच्या धुऱ्यावरून तसेच मोजणीच्या खुणा उपटण्याच्या कारणावरून नागापूर येथील दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना अंजनी बुद्रुक शिवारात घडली. या प्रकरणी दोन्ही शेतकऱ्यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने डोणगाव पोलिसांनी दोन्ही बाजूंविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

नागापूर येथील शेतकरी शरद धाबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अंजनी बुद्रुक शिवारातील गट क्रमांक ३२६ मध्ये ते शेतात काम करीत होते. यावेळी विलास धाबे यांनी मोजणीसाठी लावलेल्या लोखंडी अँगलच्या खुणा का उपटल्या, अशी विचारणा केली. त्यावरून वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप शरद धाबे यांनी केला आहे.

या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी विलास धाबे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, विलास धाबे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता गट क्रमांक ३२५ मध्ये मेहकर तहसीलदारांच्या आदेशाने मोजणीसाठी रोवण्यात आलेल्या लोखंडी अँगलच्या खुणा शरद धाबे यांनी उपटून टाकल्या. याबाबत विचारणा केली असता अश्लील शिवीगाळ करून लोटपाट केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच तहसीलदारांच्या अधिकृत आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून शरद धाबे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २९६, ११५(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार संजय घिके करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!