मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आपत्कालीन क्रमांक ११२ वर खोटा कॉल करून पोलिस यंत्रणेला विनाकारण वेठीस धरणाऱ्या उसरण येथील एका व्यक्तीला मेहकर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेत अटक केली. प्रवीण भागवत शेळके (वय ३४) असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मेहकर तालुक्यातील उसरण येथील प्रवीण शेळके याने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून उसरण येथे दोन जणांची हत्या झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच मेहकर पोलिस ठाण्यातील कर्मचारी अमोल बोर्डे व संजय पहारे यांनी तातडीने पोलिस वाहनातून उसरण गाठले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर शेळके याची भेट घेऊन दोन खून नेमके कुठे झाले आहेत, अशी विचारणा केली. मात्र, त्याने पोलिसांना धक्कादायक उत्तर देत खून झालाच नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
यानंतर त्याची ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याने दारूचे सेवन केले असल्याचे आढळून आले. आपत्कालीन क्रमांकावर खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेचा वेळ व मनुष्यबळ विनाकारण खर्ची घातल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कलम २१७ सह कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ११२ हा क्रमांक केवळ आपत्कालीन परिस्थितीतच वापरावा. खोटी माहिती देऊन अथवा गैरवापर करून पोलिस यंत्रणेला विनाकारण घटनास्थळी पाठविल्यास यंत्रणेचा वेळ, मनुष्यबळ आणि संसाधने वाया जातात. त्यामुळे नागरिकांनी आपत्कालीन सेवेचा गैरवापर करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













