जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील सुनगाव येथील २५ वर्षीय विवाहिता दिपाली अर्जुन पाटील या पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. ६७/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजताच्या दरम्यान घरातील सर्वजण झोपेत असताना दिपाली पाटील या कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर गेल्या. बराच वेळ त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरासह नातेवाईकांकडे आणि इतर संभाव्य ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर पती अर्जुन किसन पाटील यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मिसिंग क्र. ६७/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून, ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रविकांत बावस्कर पुढील तपास करीत आहेत.
दिपाली पाटील यांचे वय २५ वर्षे असून त्यांचा रंग निमगोरा, उंची सुमारे ५ फूट ५ इंच, बांधा मजबूत, केस लांब आहेत. बेपत्ता होताना त्यांनी साडी व ब्लाउज परिधान केला होता. संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने जळगाव जामोद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.














