अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या जीर्ण झालेल्या पोलीस वसाहतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तब्बल ५२ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या या पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध नसल्याने पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अंढेरा येथे आधुनिक सुविधांनी युक्त नवीन पोलीस वसाहत उभारण्यासाठी शासनाने तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.
अंढेरा पोलीस ठाण्याची सध्याची इमारत जुनी असून तिची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याच्या परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी पूर्वी बांधण्यात आलेली निवासस्थानेही जीर्ण झाली आहेत. या क्वॉर्टर्सची अवस्था पाहता तेथे वास्तव्यास राहणे धोकादायक आणि गैरसोयीचे ठरत असल्याने अनेक पोलीस कर्मचारी बाहेरून ये-जा करून आपले कर्तव्य बजावत आहेत.
५२ गावांचा भार, मनुष्यबळ मात्र अपुरे…
अंढेरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल ५२ गावांचा समावेश आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा तपास, विविध घटनांवर नियंत्रण ठेवणे तसेच बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र, मंजूर पदांच्या तुलनेत प्रत्यक्षात सुमारे निम्मेच पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याची स्थिती असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी तातडीने उपलब्ध राहावे लागते. विशेषतः आपत्कालीन परिस्थिती, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा अचानक बंदोबस्ताची गरज निर्माण झाल्यास पोलिसांची तत्काळ उपस्थिती महत्त्वाची ठरते. मात्र, पोलीस ठाण्याच्या आवारातील निवासस्थाने राहण्यायोग्य नसल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर राहावे लागत आहे. त्यामुळे नवीन पोलीस वसाहत उभारणे ही केवळ निवासाची गरज नसून ५२ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.
गणेश नागरे यांचा पाठपुरावा….
पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न भाजप नेते गणेश नागरे यांनीही वेळोवेळी लावून धरला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच शासनस्तरावर पाठपुरावा करून अंढेरा येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी नवीन निवासस्थाने उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे जीर्ण पोलीस क्वॉर्टर्सचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
नवीन वसाहतीसाठी शासकीय जागा उपलब्ध
अंढेरा पोलीस ठाण्यालगत पोलीस वसाहतीसाठी शासकीय जागा उपलब्ध असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या जागेवर आधुनिक सुविधांनी युक्त नवीन निवासस्थाने उभारल्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवास मिळू शकतो. तसेच आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी तातडीने उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे.
अंढेरा पोलीस ठाण्याची जुनी इमारत, जीर्ण क्वॉर्टर्स आणि अपुरे मनुष्यबळ या समस्या एकत्रितपणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून नवीन पोलीस वसाहतीसाठी तातडीने प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.












