Advertisement Advertisement

समृद्धी महामार्गावर स्कोडा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोघे गंभीर! डोणगावजवळ पहाटेच्या सुमारास भरधाव कार समोरील वाहनावर आदळली; दुभाजकावर धडकून कारचा चक्काचूर…..

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावर भरधाव स्कोडा कार चालकाचे नियंत्रण सुटून समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडकली. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना ७ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २६३, मुंबई कॉरिडोरवर घडली.

या अपघातात हिरेन रमेशभाई सिद्धपुरी (रा. राजकोट, गुजरात) यांचा मृत्यू झाला. तर वीरेन सिद्धपुरी आणि तुषार मकवाना हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरेन सिद्धपुरी यांच्यासह वीरेन सिद्धपुरी आणि तुषार मकवाना हे जीजे-०३-पीडी-९००४ क्रमांकाच्या स्कोडा कारने नागपूरहून मुंबईकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडोरने प्रवास करत असताना डोणगाव परिसरात पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या कारचा चालकावरील ताबा सुटला. कारने पुढे धावणाऱ्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत कारमधील हिरेन सिद्धपुरी यांचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला, तर वीरेन सिद्धपुरी आणि तुषार मकवाना गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी तातडीने मदतकार्य केले….

अपघाताची माहिती मिळताच मलकापूर केंद्रांतर्गत वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे एपीआय राहुल पाटील यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मदतकार्य करत जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहन रस्त्यावर असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी क्षतिग्रस्त कार बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

या अपघातामुळे पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर काही काळ खळबळ उडाली होती. अपघात नेमका कशामुळे झाला आणि समोरील अज्ञात वाहन कोणते होते, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!