Advertisement Advertisement

‘गणेशोत्सव आला कीच डीजेबंदीची आठवण का?’ लग्न, राजकीय सभा अन् सर्व धार्मिक उत्सवांनाही समान नियम लागू करा; आमदार श्वेताताई महाले यांची रोखठोक भूमिका…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गणेशोत्सव जवळ आला की प्रशासनाकडून डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर बंदीची चर्चा सुरू होते. मात्र, ध्वनिप्रदूषणाचा त्रास सर्वच कार्यक्रमांमध्ये होत असेल, तर नियम केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित का? असा थेट सवाल चिखलीच्या भाजप आमदार श्वेताताई महाले यांनी उपस्थित केला. डीजेवर बंदी घालायचीच असेल, तर ती केवळ गणेशोत्सवात न ठेवता लग्नसमारंभ, वाढदिवस, खासगी कार्यक्रम, राजकीय सभा तसेच सर्व धार्मिक उत्सवांसाठी सरसकट लागू करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

पुण्यातील विद्यानंद बापट यांनी सुरू केलेल्या ‘डीजेमुक्त उत्सव’ चळवळीची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बुलढाणा येथे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. प्रशासकीय अधिकारी, राजकीय प्रतिनिधी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी ध्वनिप्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत आपली मते मांडली.

यावेळी आमदार श्वेताताई महाले यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गणेशोत्सव आला कीच डीजेबंदीची चर्चा का सुरू होते?” असा सवाल करत त्यांनी लग्नसमारंभ, वाढदिवस, खासगी कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रमांमध्येही मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले.

काही ठिकाणी भोंग्यांमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाबाबत कारवाई करताना कोणताही दुजाभाव नको, अशी भूमिका महाले यांनी मांडली. “डीजेचा कर्णकर्कश आवाज आरोग्यासाठी घातक असेल, तर नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. केवळ गणेश मंडळांनाच लक्ष्य करणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘बंदी करायची असेल तर वर्षभर करा!’

डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यायचा असेल, तर तो केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर आणि सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना लागू करावा, अशी मागणी आमदार महाले यांनी केली. त्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे शांतता समितीच्या बैठकीत डीजेबंदीच्या मुद्द्यावर चांगलीच चर्चा रंगली.

आता ध्वनिप्रदूषणाबाबत प्रशासन सर्व कार्यक्रमांसाठी समान नियम लागू करणार का आणि आमदार महाले यांनी उपस्थित केलेल्या सवालांवर प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!