मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या ‘डायल ११२’ या क्रमांकाचा गैरवापर करून पोलिसांना चोर आल्याची खोटी माहिती देणाऱ्या २५ वर्षीय युवकावर बोराखेडी पोलिसांनी कारवाई केली आहे. पिंपळखुटा येथील शुभम रमेश उमाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २१७ अन्वये एन.सी. दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ‘डायल ११२’ वर पिंपळखुटा, ता. मलकापूर येथे चोर आल्याची माहिती देणारा फोन आला. आपत्कालीन कॉल मिळताच पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली. रात्री गस्तीवर असलेले हेकाँ. अमोल खराडे, एपीआय बालाजी शेंगेपल्लु आणि चालक वैभव खरमाळे हे शासकीय वाहनाने तातडीने पिंपळखुट्याकडे रवाना झाले.
रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी पोलीस गावात पोहोचले. पोलिसांनी फोन करणाऱ्या शुभम उमाळे याच्याकडे चोरीबाबत विचारणा केली असता, गावात कोणतीही चोरी झाली नसल्याचे समोर आले. घरात कोणी नसल्याने आपण पोलिसांना केवळ खोटी माहिती देऊन बोलावल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले.
आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांची दिशाभूल केल्याचे तसेच ‘डायल ११२’ यंत्रणेचा गैरवापर केल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली.
याप्रकरणी हेकाँ. अमोल खराडे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी शुभम रमेश उमाळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २१७ अन्वये एन.सी. दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेकाँ. विजय सुरळकर करीत आहेत.













