Advertisement Advertisement

मलकापूरात चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ! घरं फोडती, दुचाक्या पळवती अन् रात्रीच्या अंधारात चोरटे बिनधास्त फिरतीत; सीसीटीव्हीत सगळा कारनामा कैद, नागरिक म्हणतीत—‘आता पोलिसांनी चोरट्यांची वाट लावावी!’

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या, लुटमार, महिलांच्या अंगावरील दागिने लांबविणे तसेच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रात्रीच्या वेळी चोरटे परिसरात खुलेआम फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर येऊन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मलकापूर शहर व ग्रामीण भागात मागील काही काळापासून चोरीच्या घटनांची मालिका सुरू असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी काटी येथे चोरट्यांनी एका घरावर दरोडा टाकला होता. चोरट्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या प्रकारात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतरही दुसऱ्याच दिवशी धानोरा, काटीसह परिसरातील काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

शहरातही विविध भागांत घरफोड्या झाल्या असून, काही दिवसांपूर्वी एका घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घर फोडून सुमारे ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. ग्रामीण भागातही घरफोडीबरोबरच दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांसमोर आव्हान…..

दरम्यान, रात्रीच्या वेळी काही संशयित व्यक्ती शहर व ग्रामीण भागात फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या फुटेजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. चोरटे खुलेआम फिरत असल्याचे फुटेज समोर येत असल्याने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी या फुटेजची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

पोलिसांची गस्त वाढवली; विविध पथके सक्रिय….

शहरात घडणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून, विविध पथके तयार करण्यात आली आहेत. संशयित व्यक्ती व वाहनांवर लक्ष ठेवण्यासोबतच चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

बाहेरगावी जाताना पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन…

दरम्यान, नागरिकांनी घर बंद करून बाहेरगावी जाताना त्याबाबतची माहिती पोलिस प्रशासनाला द्यावी. तसेच बाहेरगावी गेल्यानंतर सोशल मीडियावर घराबाहेर असल्याचे फोटो किंवा माहिती शेअर करणे टाळावे. अशा पोस्टच्या माध्यमातून चोरट्यांना घर बंद असल्याची माहिती मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रात्री-बेरात्री किंवा दिवसा संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदार गणेश गिरी यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!