साखरखेर्डा/जालना (बुलडाणा कव्हरेज न्युज) : येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) कॅम्पमध्ये कर्तव्यावर असलेल्या २४ वर्षीय जवानाने मंगळवारी (ता. १) पहाटे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अजय माधवराव वाकोडे (रा. गुंज, जि. बुलढाणा) असे गंभीर जखमी झालेल्या जवानाचे नाव आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय वाकोडे हा सोमवारी रात्री एसआरपीएफ कॅम्पमध्ये नियमित कर्तव्यावर होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कॅम्प परिसरात अचानक गोळीबाराचा आवाज झाल्याने कर्तव्यावरील सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अजय गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. सहकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
अजय वाकोडे हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील गुंज येथील रहिवासी असून, सुमारे दीड वर्षापूर्वी तो एसआरपीएफच्या सेवेत दाखल झाला होता. कर्तव्यावर असताना त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संबंधित शस्त्र ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक तणाव, कामाचा ताण किंवा अन्य वैयक्तिक कारण या सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्याच्यासोबत कर्तव्यावर असलेल्या सहकाऱ्यांसह नातेवाईकांचीही चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.या घटनेमुळे गुंज गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.













