चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील भोगावती शिवारातील शेतात बांधून ठेवलेले तब्बल २४ हजार ५०० रुपये किमतीचे तीन बोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मात्र, बोकडांच्या मालकाने घेतलेल्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला असून, चिखली पोलिसांनी भोगावती गावातीलच तीन जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
भोगावती येथील शेतकरी विशाल शिवाजी लोखंडे (वय ३१) हे शेतीसोबत शेळीपालनाचा जोडधंदा करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भोगावती शिवारातील गट क्रमांक ९४ मधील शेतातील तारेच्या कम्पाउंडमध्ये असलेल्या शेडमध्ये शेळ्या व बोकड बांधून ते घरी गेले होते.
दुसऱ्या दिवशी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता शेतात जाऊन पाहणी केली असता शेडमधील दोन बोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये सुमारे ७ हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा बोकड आणि ९ हजार ५०० रुपये किमतीचा काळा-पांढऱ्या रंगाचा बोकड होता.
विशाल लोखंडे यांच्या शेजारील शेडमध्ये त्यांचे चुलत भाऊ अशोक साहेबराव लोखंडे यांनी बांधलेला सुमारे ८ हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा बोकडही चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे एकूण तीन बोकडांची किंमत सुमारे २४ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, चोरीला गेलेल्या बोकडांचा शोध घेत असताना शेजारील गावातील नागरिकांकडून एका इसमाने काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर बोकड घेऊन गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे खासगाव येथील बकरी बाजारात चौकशी करण्यात आली.
तेथे व्यापारी चांद भाय यांच्याकडे पांढरा रंगाचा बोकड आढळून आला. व्यापाऱ्याने दाखवलेल्या खरेदीच्या फोटोवरून सदर बोकड विकणारे इसम हे भोगावती येथील आदिल चौधरी, तस्लीम नवरंगी आणि गोलु चौधरी असल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी विशाल शिवाजी लोखंडे यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात आदिल चौधरी, तस्लीम नवरंगी व गोलु चौधरी या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३ (२) व ३ (५) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करीत असून, चोरीला गेलेल्या इतर बोकडांचा शोध तसेच या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.














