देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुलीला सोबत पाठविण्याच्या मागणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुंडी येथे बुधवारी (दि. २६) दुपारी सुमारे १२ वाजता घडली. जमावाने घरात प्रवेश करून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप असून, मायलेकाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गारगुंडी येथील राधाबाई भानुदास काकड (वय ४५) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, राधाबाई या आपल्या मुलासोबत घरात जेवण करीत असताना काही जणांचा जमाव त्यांच्या घरात आला.
यावेळी गणेश नारायण इलग आणि अर्चना राजेंद्र इलग यांनी राधाबाई यांच्याकडे मुलीला त्यांच्यासोबत पाठविण्याची मागणी केली. त्यावर राधाबाई यांनी, “मुलगी घरी नाही; तुम्ही तिला न्यायालयीन प्रक्रियेतून घेऊन जा,” असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर गणेश इलग आणि अर्चना इलग यांनी राधाबाई यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी गणेश नारायण इलग, बळीराम विठ्ठल इलग, कैलास बबन इलग, संतोष गणपत इलग, ज्ञानराज विठ्ठल इलग, अर्चना राजेंद्र इलग, सिंधू भगवान इलग आणि परीक्षित विठ्ठल इलग यांनी राधाबाई यांच्या मुलालाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेदरम्यान मायलेकाला शिवीगाळ करण्यात आली तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर राधाबाई यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
राधाबाई यांच्या तक्रारीसोबतच वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत. घटनेमुळे गारगुंडी परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलिस तपासात या वादामागील नेमके कारण आणि घटनेचा पुढील तपशील समोर येणार आहे.













