जानेफळ (बुलढाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील एका नामांकित विद्यालयात विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तन्मय समाधान खंडागळे या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप असून, या घटनेत तो जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाचे नाव राहुल जाधव असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल जाधव हे वर्गात शिकवत असताना विद्यार्थी तन्मय खंडागळे याने ‘दहा वेळा शून्य हा मोबाईल क्रमांक असू शकतो का?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नावरून शिक्षकाचा राग अनावर झाला आणि त्यांनी वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर तन्मयला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या आई-वडिलांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्याच्या पाठीवर, चेहऱ्यावर, कानामागे तसेच डोक्यावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या आहेत. घटनेनंतर विद्यार्थ्याचे वडील समाधान रामराव खंडागळे, रा. मारुती पेठ, ता. मेहकर यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
शिक्षकाकडूनच मारहाणीचा आरोप झाल्याने पालकांमध्ये संताप…
शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देणारी जागा असावी, अशी अपेक्षा असताना शिक्षकाकडूनच विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा आरोप समोर आल्याने पालक आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पुढे आली आहे. पोलिस तपासातून मारहाणीचे नेमके कारण, घटनेची परिस्थिती आणि संबंधित शिक्षकाची भूमिका स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणात संबंधित शिक्षकाची बाजू तसेच पोलिस तपासातील अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे पालकांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
















