Advertisement Advertisement

लोणार तालुक्यात ६० जि.प. शाळांचा पोषण आहार रखडला! दोन महिने तांदूळच नाही; हजारो विद्यार्थ्यांचा मध्यान्ह भोजनाचा घास हिरावला….

लोणार (बुलढाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन दोन महिने उलटले असतानाही सुमारे ६० जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहारासाठी तांदूळच पोहोचलेला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनापासून वंचित राहावे लागत आहे. लोणार तालुक्यात एकूण १२८ जिल्हा परिषद शाळा असून, अंदाजे ८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार हा केवळ भोजन नसून शिक्षणासोबतच पोषणाचीही महत्त्वाची आधारव्यवस्था आहे. सकाळी उपाशीपोटी शाळेत येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाचा आधार असतो. मात्र अनेक शाळांमध्ये जुलैपासून तांदळाची एकही गोणी पोहोचलेली नसल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्याध्यापकांवर कारवाई, मग पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर कारवाई कधी?

मुख्याध्यापकांच्या हातून एक दिवस पोषण आहार शिजला नाही तरी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मग दोन महिने शाळांमध्ये तांदूळच पोहोचला नाही, तर याची जबाबदारी कोणाची? असा सवाल आता पालक आणि शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.

काही मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, तांदळाच्या पुरवठ्याबाबत बीट अधिकारी, गटशिक्षण अधिकारी कार्यालय तसेच संबंधित पुरवठा विभागाला वारंवार माहिती देण्यात आली आहे. याबाबत लेखी अर्जही देण्यात आले आहेत. मात्र, ‘टेंडरची प्रक्रिया सुरू आहे’, असे उत्तर देत वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप आहे. तांदूळच उपलब्ध नसताना विद्यार्थ्यांसाठी भात शिजवायचा तरी कसा, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर आहे.

‘प्रक्रिया सुरू’च्या नावाखाली विद्यार्थ्यांचा घास रखडला…

शासनाकडून शालेय पोषण आहाराबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. कोणताही विद्यार्थी उपाशी राहणार नाही, असे सांगितले जाते. मात्र लोणार तालुक्यात शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अनेक शाळांमध्ये तांदूळ पोहोचलेला नाही. त्यामुळे निधीचा अभाव, नियोजनातील त्रुटी की प्रशासकीय उदासीनता, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणाशी संबंधित योजनेत एवढा मोठा विलंब होणे ही गंभीर बाब असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण अद्याप नाही….

या प्रकाराबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट लेखी स्पष्टीकरण समोर आलेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नावर ठोस आवाज उठविलेला दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थी वंचित, शिक्षक हतबल आणि प्रशासन मात्र शांत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोणार तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये तातडीने तांदळाचा पुरवठा करून विद्यार्थ्यांचा रखडलेला पोषण आहार सुरळीत करावा आणि दोन महिन्यांच्या विलंबाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!