जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): मोळी येथील नागेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीला अवघ्या ४८ तासांत अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद माळी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.


जाहिरात 👆
जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील मोळी येथील नागेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी ९ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी फोडली होती. चोरट्यांनी दानपेटीतील रोख रक्कम तसेच दान केलेले सोन्या-चांदीचे ऐवज लंपास केले होते. याप्रकरणी मंदिराच्या तक्रारीवरून जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांना सावत्रा, ता. मेहकर येथील भीमराव माधव गवई याच्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीकडून चोरीची १८ हजार ९८४ रुपयांची रोख रक्कम, विविध चलनी नोटा व नाणी, तसेच गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन, अंदाजे १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नाग, १ ग्रॅम वजनाचा चांदीचा नाग, चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि दानपेटी फोडण्यासाठी वापरलेले लोखंडी दोन गज असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या या जलद आणि प्रभावी तपासामुळे मंदिरातील चोरीचा गुन्हा अवघ्या ४८ तासांत उघडकीस आला. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद माळी व त्यांच्या पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
या कारवाईमुळे जानेफळ पोलिसांच्या तपासकौशल्याचे आणि तत्परतेचे कौतुक होत आहे.















