Advertisement Advertisement

BREAKING:मुंबई आंदोलनाआधी ‘क्रांतिकारी’च्या शिलेदारांची धरपकड सुरू! ‘आंदोलक मुंबईत पोहोचू नयेत’ म्हणून पोलिसांची धावपळ; शुभम राऊत पहाटे घरातून उचलले, तुपकरांचा फोनही बंद—पोलिसांकडून शोधमोहीम; ‘भूमिगत’ होत क्रांतिकारीचे शिलेदार उद्या मुंबईत धडकणार? तुपकर आंदोलनस्थळी पोहोचतीलच, कार्यकर्त्यांचा विश्वास; तुपकरांचा सरकारला थेट इशारा—‘शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून चळवळीचा आवाज दाबता येणार नाही!’

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा एल्गार पुकारला असतानाच आता प्रशासनाने आंदोलन रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मुंबईकडे कार्यकर्ते रवाना होण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंदोलनाच्या आदल्या दिवशीच बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे. खामगाव येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुभम राऊत यांना शेगाव ग्रामीण पोलिसांनी आज पहाटे त्यांच्या राहत्या घरातून स्थानबद्ध केल्याची माहिती आहे. मुंबईतील आंदोलनाला कार्यकर्त्यांनी जाऊ नये, यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी शुभम राऊत यांना सांगितल्याचे समजते. विशेष म्हणजे, यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान मुंबईत झालेल्या ‘झाडावर चढून’ केलेल्या आंदोलनात शुभम राऊत सहभागी झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे तुपकरांना पोलिसांची नोटीस, दुसरीकडे त्यांच्या समर्थकांची धरपकड आणि आता स्वतः रविकांत तुपकरांचाही शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न—मुंबई आंदोलनाची धग बुलढाण्यातच रोखण्यासाठी प्रशासनाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.

तुपकर काल सकाळपासून ‘भूमिकेत’; फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरू!

दरम्यान, रविकांत तुपकर काल सकाळपासून पोलिसांच्या रडारवर असून त्यांचा मोबाईल फोन बंद येत असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून तुपकर यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मात्र, तुपकर नेमके कुठे आहेत, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. दुसरीकडे, रविकांत तुपकर कोणत्याही परिस्थितीत आंदोलनस्थळी पोहोचतीलच, असा ठाम विश्वास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तुपकर ‘भूमिगत’ पद्धतीने हालचाल करत उद्या मुंबईतील आंदोलनस्थळी धडकणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. केवळ तुपकरच नव्हे, तर पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करत अनेक कार्यकर्तेही भूमिगत पद्धतीने मुंबईत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी कितीही धरपकड केली, तरी आंदोलनाचा जमाव मुंबईत कसा पोहोचतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘आंदोलक मुंबईत पोहोचू नयेत’ म्हणून पोलिसांची मोर्चेबांधणी?

२७ ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तुपकर समर्थकांवर लक्ष केंद्रित केले असून, इतरही कार्यकर्त्यांची धरपकड किंवा स्थानबद्धता होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आज दिवसभरात आणखी कोणावर कारवाई होते, याकडे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस मिळाल्यानंतरही तुपकरांनी ‘२७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच’ अशी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.

तुपकरांचा पोलिस कारवाईवर थेट हल्लाबोल!

कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाल्यानंतर रविकांत तुपकरांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून, अटक करून किंवा स्थानबद्ध करून या चळवळीचा आवाज दबता येणार नाही. आमच्या मागण्या रास्त आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळालेच पाहिजे. या मागणीसह शेतकऱ्यांच्या इतर न्याय्य मागण्यांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे,” असा इशारा तुपकरांनी दिला आहे. पोलिस कारवाईचा कितीही धाक दाखवला, तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करत तुपकर म्हणाले, “कितीही पोलिस कारवाया करा, कितीही पोलिसांचा धाक दाखवा; आंदोलन थांबणार नाही. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत. मात्र सरकार ज्या पद्धतीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, ती पद्धत इंग्रजांपेक्षाही वाईट आहे,” असा घणाघाती आरोप तुपकरांनी केला.

२७ ऑगस्टचा मुंबई एल्गार आता प्रतिष्ठेचा!

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, जुन्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय, कर्ज पुनर्गठनामुळे वंचित राहिलेल्यांचा समावेश आणि इतर मागण्यांसाठी तुपकरांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी त्यांनी सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक जाहीर लिलाव करण्याचा इशाराही दिला आहे. आता आंदोलनाच्या काही तास आधीच कार्यकर्त्यांची धरपकड, तुपकरांचा बंद असलेला फोन आणि पोलिसांकडून सुरू असलेला शोध यामुळे २७ ऑगस्टचा मुंबई आंदोलनाचा एल्गार अधिकच तापला आहे. पोलिसांच्या कारवाईला चकवा देत तुपकर आणि त्यांचे शिलेदार मुंबईत कसे पोहोचतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!