Advertisement Advertisement

लोणारमध्ये भरदिवसा कारची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास…

लोणारमध्ये भरदिवसा कारची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास…

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चहा पिण्यासाठी हॉटेलसमोर उभी केलेल्या कारची काच दगडाने फोडून अज्ञात चोरट्याने साडेतीन लाख रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केल्याची घटना लोणार शहरातील लोणी नाका परिसरात २० ऑगस्ट रोजी भरदिवसा घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप माधवराव खरले हे मूळचे जालना येथील रहिवासी असून सध्या केशव शिवणी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा कांदा बियाण्याचा व्यवसाय आहे. खरेदीच्या कामानिमित्त ते पांग्राडोळे येथे गेले होते. तेथून परतताना त्यांनी शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी नाक्याजवळ एका हॉटेलसमोर त्यांची एमएच-२८/सीसी-५७५४ क्रमांकाची कार उभी केली.

खरले हे चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने कारच्या चालकाच्या आसनामागील खिडकीची काच दगडाने फोडली. त्यानंतर सीटवर ठेवलेली साडेतीन लाख रुपयांची रोकड तसेच महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरट्याने लंपास केली आणि लोणी रस्त्याच्या दिशेने पोबारा केला.

काही वेळाने कारजवळ आल्यानंतर खरले यांच्या हा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरीचा तपास सुरू केला आहे. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे लोणी नाका परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!