Advertisement Advertisement

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव- डॉ खेडेकरांची भेट अन् चिखलीत राजकीय चर्चेला ऊत! सदिच्छा भेट म्हणायची की नव्या राजकीय डावाची चाहूल?गप्पांत नेमकं काय शिजलं?…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती खेडेकर यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. ही भेट १८ ऑगस्ट रोजी झाल्याची माहिती डॉ. खेडेकर यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून समोर आली आहे.

डॉ. खेडेकर यांनी या भेटीदरम्यान विविध सामाजिक, राजकीय तसेच विकासात्मक विषयांवर चर्चा झाल्याचे आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे वरकरणी ही भेट सदिच्छा भेट म्हणून सांगितली जात असली, तरी सध्या चिखली मतदारसंघातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा रंगली आहे.

विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून राजकीय बांधणीला वेग येत असताना दोन वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांतील प्रमुख नेत्यांची भेट चर्चेचा विषय ठरणे स्वाभाविक मानले जात आहे. मात्र, या भेटीत कोणत्याही राजकीय निर्णयावर चर्चा झाली किंवा भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत काही ठोस निर्णय घेण्यात आला, अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, चिखलीच्या राजकारणात या भेटीचे नेमके राजकीय पडसाद काय उमटणार, याकडे राजकीय कार्यकर्त्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. सदिच्छा भेटीच्या निमित्ताने झालेल्या चहापानातील गप्पांमध्ये नेमके काय शिजले? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या भेटीचा पुढील राजकीय घडामोडींवर किती परिणाम होतो, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या भेटीला सध्या कोणताही अधिकृत राजकीय अर्थ देण्यात आलेला नसून, डॉ. खेडेकर यांनी ती सामाजिक, राजकीय व विकासात्मक विषयांवरील सदिच्छा भेट असल्याचेच स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!