खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुलगा आजारी असल्याने त्याला दवाखान्यात घेऊन जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली २१ वर्षीय विवाहित महिला आणि तिचा दोन वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना दाधम येथे घडली. या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वाती आकाश वानखडे (वय २१) आणि तिचा मुलगा यश आकाश वानखडे (वय २) हे १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडले. मुलाला दवाखान्यात घेऊन जात असल्याचे सांगून त्या घराबाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या मुलासह घरी परतल्या नाहीत.
कुटुंबीयांनी नातेवाईक, परिचित तसेच संभाव्य ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, स्वाती आणि यश यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर स्वातीची आई वर्षा वाकोडे यांनी याबाबत हिवरखेड पोलिसांत तक्रार दिली.
या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी स्वाती वानखडे आणि तिचा मुलगा यश वानखडे यांच्या बेपत्ता असल्याची नोंद (मिसिंग) केली असून, पुढील तपास सुरू आहे. महिला व तिच्या मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














