ग्रामपंचायतींवर प्रशासक; विकासकामांना ब्रेक! निवडणुका लांबल्याने गावगाडा ठप्प….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामपंचायतींची मुदत संपूनही निवडणुकांचा बिगुल वाजलेला नसल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा कारभार सध्या प्रशासकांच्या हाती गेला आहे. मात्र, प्रशासकांना शासनाकडून मर्यादित अधिकार देण्यात आल्याने गावातील विकासकामांना मोठा ब्रेक लागला आहे. लोकनियुक्त पदाधिकारी नसल्याने ग्रामस्थांच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडविण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधीच उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात मुदत संपलेल्या तसेच नव्याने विसर्जित झालेल्या ग्रामपंचायतींवर शासकीय प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुका लांबत असल्याने तळागाळातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार नोकरशाहीच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे गावांच्या विकासाचा गाडा रेंगाळल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
रस्ते, गटारे, दिवाबत्ती अन् पाणीयोजनांना ब्रेक….
ग्रामपंचायतींमध्ये रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती, गटारे बांधकाम, पाणीयोजनांचा विस्तार यांसारखी विविध विकासकामे केली जातात. मात्र, प्रशासकांच्या मर्यादित अधिकारांमुळे अनेक कामे पुढे सरकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे गावातील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
प्रशासकांच्या अधिकारांना मर्यादा….
शासनाच्या निर्देशांनुसार प्रशासकांना दीर्घकालीन अथवा महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार मर्यादित आहेत. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, नियमित वीजबिले भरणे, अत्यावश्यक स्वच्छता यांसारख्या दैनंदिन आणि तातडीच्या कामांपुरताच त्यांचा खर्चाचा अधिकार असल्याने मोठ्या विकासकामांना मंजुरी देणे किंवा नवीन कामे सुरू करणे अडचणीचे ठरत आहे.
कंत्राटदारांची लाखो रुपयांची बिले अडकली….
ग्रामपंचायतीची विकासकामे पूर्ण करून त्यासंबंधीची कागदपत्रे आणि बिले सादर करूनही अनेक कंत्राटदारांचे पैसे अडकून पडल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या विकासकामांची बिले काढण्यास निर्बंध असल्याने लहान कंत्राटदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
नव्या निविदांना मज्जाव; जुनी बिलेही रखडली….
ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांकडे गेल्यानंतर आर्थिक व्यवहारांवरही निर्बंध आले आहेत. नवीन विकासकामांच्या निविदा काढण्यास मज्जाव असल्याने गावातील प्रलंबित कामे पुढे नेता येत नाहीत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीची मुदत संपण्यापूर्वी पूर्ण झालेल्या काही कामांची जुनी बिलेही अदा करता येत नसल्याने कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पावसाळ्यात गावकऱ्यांची गैरसोय वाढली….
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रखडलेल्या विकासकामांचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचणे, अंतर्गत रस्त्यांवर चिखल होणे, गटारे व नाल्यांच्या समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकर घेऊन लोकनियुक्त प्रतिनिधींच्या माध्यमातून गावांचा कारभार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.















