करमोड्याच्या सरपंचाने जीव दिला; ‘राजीनामा दे, मला सरपंच व्हायचंय’ म्हणत धमकावल्याचा आरोप…
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : करमोडा गट ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक प्रकाश उगले (वय ४६) यांनी एका व्यक्तीकडून सातत्याने दबाव व धमक्या दिल्या जात असल्याच्या त्रासातून टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. ११ ऑगस्ट रोजी लोहगाव शिवारातील शेतात ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी वैभव उर्फ भय्या दादाराव वर्गे (वय ३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दीपक उगले हे संग्रामपूर तालुक्यातील करमोडा गट ग्रामपंचायतीचे सरपंच होते. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, आरोपी वैभव वर्गे हा मागील काही वर्षांपासून ‘सरपंचपदाचा राजीनामा दे, मला सरपंच व्हायचे आहे’ असे म्हणत दीपक उगले यांच्यावर दबाव आणत होता. तसेच फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीत धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेपूर्वी दीपक उगले यांनी सोशल मीडियावर आरोपीकडून होत असलेल्या त्रासाबाबत मजकूर प्रसिद्ध केल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा….
या प्रकरणी मृताचे भाऊ श्रीकृष्ण प्रकाश उगले यांनी तामगाव पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून वैभव उर्फ भय्या दादाराव वर्गे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०८ आणि ३५१ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक उगले यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या मजकुरात आपल्यावर होत असलेल्या कथित मानसिक त्रासाचा आणि धमक्यांचा उल्लेख केल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे. आरोपीकडून आपल्या कुटुंबाला धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे करीत आहेत. तपासातून या प्रकरणातील नेमकी पार्श्वभूमी आणि आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे. :::












