देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कौटुंबिक वादातून पतीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत एका महिलेने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध रविवारी गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला देऊळगाव राजा येथील रहिवासी असून त्या शिक्षिका आहेत. त्यांचे पती अमडापूर येथील उर्दू जिल्हा परिषद कन्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
रविवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पती घरी आल्यानंतर कौटुंबिक कारणावरून वाद झाला. त्यानंतर संशय घेण्याच्या कारणावरून पतीसह इतर व्यक्तींनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. तसेच तक्रारदार महिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी अब्दुल सईद अब्दुल हमीद (रा. आदर्श कॉलनी, देऊळगाव राजा), अब्दुल हमीद शेख मोहम्मद, शकीला बी. अब्दुल हमीद आणि अब्दुल हमीद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलिसांकडून सुरू असून, तक्रारीतील आरोपांची चौकशी करण्यात येत आहे.














