चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले चिखलीचे भूमिपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय ३६) यांच्यावर सोमवारी, १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी चिखलीत हजारोंचा जनसागर उसळला होता. ‘शहीद जवान हरिदास कापसे अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अत्यंत भावूक वातावरणात वीर जवान हरिदास कापसे पंचत्वात विलीन झाले.
मूळचे शेलसूर येथील रहिवासी असलेले हरिदास कापसे सध्या चिखलीत वास्तव्यास होते. उत्तराखंडमध्ये युनिट ४१८ (आय) एफडी सीओवाय, ९ (आय) एमटीएन बीडीईच्या ऑपरेशन एरियात ते कर्तव्य बजावत होते. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्यांना वीरमरण आले. देशसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या या भूमिपुत्राचे पार्थिव चिखलीत येणार असल्याची माहिती मिळताच सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांवर जमा झाले होते.
मेहकर फाट्यापासून निघाली मोटारसायकल रॅली….
शहीद जवानाचे पार्थिव चिखलीत दाखल होताच मेहकर फाट्यापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर पार्थिव दांडगे ले-आऊट येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी साश्रूनयनांनी आपल्या भूमिपुत्राला अभिवादन केले.
कुटुंबीय, नातेवाइक आणि नागरिकांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सिद्ध सायन्स चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बसस्थानक मार्गे अंत्ययात्रा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोहोचली. अनेकांच्या हातात तिरंगा होता. ‘हरिदास कापसे अमर रहे’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी वातावरण देशभक्तिमय झाले होते.
हजारोंच्या गर्दीने वाहिली श्रद्धांजली….
तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार्थिव पोहोचताच वातावरण अधिकच भावूक झाले. हजारो नागरिकांनी अंतिम दर्शन घेत पुष्प अर्पण करून शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली. दुकानदार, व्यापारी, युवक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनीही अंत्ययात्रेच्या मार्गावर थांबून आपल्या वीर जवानाला अखेरचा सलाम केला.
मान्यवरांकडून पुष्पचक्र अर्पण…..
आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, शेलसूरचे सरपंच विजय धंदर, ऋषी जाधव, नगर परिषद उपाध्यक्षा वैशाली खेडेकर, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन डॉ. रूपाली सरोदे, तहसीलदार विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, कर्नल सुहास जतकर, नगर परिषद अधिकारी अर्जुनराव इंगळे, रामेश्वर सोळंकी, ज्ञानेश्वर ठेंग, डॉ. बोर्डे आदींनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर, बाजार समिती सभापती समाधान सुपेकर, डॉ. ज्योती खेडेकर, कुणाल गायकवाड, मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खाडे, ठाणेदार भूषण गावंडे, कर्नल सुहास जगताप यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
हवेत पाच फैरी झाडून मानवंदना…..
सैन्य दलाच्या जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने वीर जवानाला अखेरची मानवंदना दिली. सैन्य दलाची तुकडी आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने हवेत पाच फैरी झाडून हवालदार हरिदास कापसे यांना सलामी दिली. बंदुकीच्या फैरींचा आवाज होताच काही क्षण संपूर्ण मैदान स्तब्ध झाले.
यानंतर वीर जवानाच्या पार्थिवावर असलेला राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक कापसे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावूक ठरला. ज्या तिरंग्याच्या सन्मानासाठी हरिदास कापसे यांनी आपले आयुष्य देशसेवेला वाहिले, तोच तिरंगा त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन होताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
शहीद जवानाच्या स्मरणार्थ शेलसूरमध्ये स्मारक….
हवालदार हरिदास कापसे यांच्या बलिदानाची स्मृती चिरंतन जपण्यासाठी त्यांच्या मूळगावी शेलसूर येथे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही आमदार श्वेता महाले यांनी दिली. शेलसूर ग्रामस्थांकडून वीरपुत्राच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महाले यांनी स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले.
हरिदास कापसे यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान हे शेलसूरसह संपूर्ण चिखली मतदारसंघासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे शौर्य, त्याग आणि देशभक्ती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शेलसूर येथे विशेष स्मारक उभारण्यात येईल, असे आ. महाले यांनी सांगितले.
चिखलीकरांच्या स्मरणात कायम राहणार शौर्य….
देशाच्या सीमेचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या हवालदार हरिदास कापसे यांना चिखलीकरांनी अश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. हजारोंच्या उपस्थितीत झालेला हा अंत्यविधी त्यांच्या देशसेवेची आणि बलिदानाची साक्ष ठरला. ‘हरिदास कापसे अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमलेली चिखलीची भूमी त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची साक्ष कायम देत राहील.















