बुलढाणा :(बुलडाणा कव्हरेज न्युज) नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि विविध संकटांपासून पिकांना आर्थिक संरक्षण देणाऱ्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे यंदा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. खरीप २०२५च्या तुलनेत खरीप २०२६ मध्ये पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल १ लाख २ हजार ३९९ ने घटली आहे. त्याचबरोबर विमा उतरविलेल्या क्षेत्रातही १ लाख ९४ हजार ५८३ हेक्टरची घट झाली आहे. त्यामुळे यंदा पीकविमा योजनेला गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठा फटका बसला आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या प्रशासकीय डॅशबोर्डवरील सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, खरीप २०२५ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७१३ शेतकऱ्यांनी तब्बल ४ लाख ९२ हजार १८४ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविला होता. यासाठी एकूण सकल प्रीमियम २३१.१८ कोटी रुपये होता.
मात्र, खरीप २०२६ मध्ये विमाधारक शेतकऱ्यांची संख्या घटून १ लाख ६८ हजार ३१४ इतकी झाली आहे. विमा उतरविलेले क्षेत्रही कमी होऊन २ लाख ९७ हजार ६०१ हेक्टर राहिले. यामुळे एकूण सकल प्रीमियममध्येही मोठी घट झाली असून, यंदा तो केवळ ९९.७२ कोटी रुपये इतका राहिला आहे. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत सकल प्रीमियममध्ये तब्बल १३१.४६ कोटी रुपयांची घट झाली आहे.
शेतकरी हिस्साही १० कोटींनी घटला…
पीकविमा योजनेत शेतकऱ्यांच्या खिशातून भरण्यात येणाऱ्या हिस्स्यातही यंदा घट झाली आहे. खरीप २०२५ मध्ये शेतकरी हिस्सा ३६.७४ कोटी रुपये होता. यंदा हा हिस्सा घटून २६.४५ कोटी रुपये झाला आहे. म्हणजेच शेतकरी हिस्स्यात १०.२९ कोटी रुपयांची घट झाली आहे.
याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या हिस्स्यातही प्रत्येकी ६०.५८ कोटी रुपयांची घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे पीकविमा योजनेतील यंदाची घट शेतकरी संख्या, विमा क्षेत्र आणि प्रीमियम अशा तिन्ही पातळ्यांवर दिसून येत आहे.
मेहकरमध्ये सर्वाधिक शेतकरी विम्यापासून दूर….
तालुकानिहाय आकडेवारी पाहता मेहकर तालुक्यात सर्वाधिक घट झाली आहे. येथे गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १७ हजार २२ शेतकरी पीकविम्यापासून दूर राहिले आहेत. त्यानंतर लोणार तालुक्यात १५ हजार ८८३, तर खामगाव तालुक्यात ८ हजार १४२ शेतकऱ्यांची घट झाली आहे.
यामुळे खरीप २०२६ मध्ये जिल्ह्यातील पीकविमा योजनेचा प्रतिसाद गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी राहिला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याबरोबरच विमा उतरविलेल्या क्षेत्रातही मोठी घट झाल्याने यंदा पीकविमा योजनेपासून जिल्ह्यातील मोठा शेतकरी वर्ग दूर राहिल्याचे चित्र आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
आकडेवारीतून दिसणारी मोठी घट…
– विमाधारक शेतकरी: २,७०,७१३ वरून १,६८,३१४
– शेतकरी घट: १,०२,३९९
– विमा क्षेत्र: ४,९२,१८४ हेक्टरवरून २,९७,६०१ हेक्टर
– क्षेत्रातील घट: १,९४,५८३ हेक्टर
– सकल प्रीमियम: २३१.१८ कोटींवरून ९९.७२ कोटी
– प्रीमियममधील घट: १३१.४६ कोटी रुपये
– शेतकरी हिस्सा: ३६.७४ कोटींवरून २६.४५ कोटी
– शेतकरी हिस्स्यातील घट: १०.२९ कोटी रुपये
















