मक्याच्या पोत्यांची थप्पी अचानक कोसळली; दोन हमाल दबले, एकाचा पाय मोडला! साखरखेर्डा शासकीय धान्य गोदामातील घटना; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : साखरखेर्डा येथील शासकीय धान्य गोदामात मक्याच्या पोत्यांची थप्पी अचानक कोसळल्याने दोन हमाल पोत्यांखाली दबल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी घडली. या दुर्घटनेत भानुदास कुरंगळ यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन हाड मोडले आहे. त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने सहकाऱ्यांनी वेळीच मदत केल्याने दोन्ही हमालांना पोत्यांमधून बाहेर काढण्यात आले.
गोदामातून मक्याची पोती वाहनात भरण्याचे काम सुरू असताना अचानक पोत्यांची उंच थप्पी कोसळली. त्याखाली भानुदास कुरंगळ आणि शंकर वाघ हे दोन हमाल दबले. घटना घडताच उपस्थित कामगारांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही पोत्यांमधून बाहेर काढले. कुरंगळ यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धान्य हाताळणीचे काम जीवघेणे?
सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यात हमालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून आलेले धान्य उतरविणे, गोदामात पोत्यांच्या थप्प्या रचणे तसेच स्वस्त धान्य दुकानांकडे पाठविण्यासाठी पुन्हा पोती वाहनांमध्ये चढविणे, अशी कष्टाची आणि जोखमीची कामे हमालांकडून केली जातात.
मात्र, या कामादरम्यान हमालांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने, सुरक्षित पद्धतीने पोत्यांच्या थप्प्या रचण्याचे प्रशिक्षण आणि आपत्कालीन मदत व्यवस्था पुरेशी आहे का, असा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
सुरक्षा उपाययोजनांची मागणी….
शासकीय गोदामांमध्ये काम करणाऱ्या हमालांना सुरक्षा विमा तसेच महागाई निर्देशांकानुसार विविध लाभ दिले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, हे लाभ प्रत्यक्षात सर्व हमालांपर्यंत पोहोचतात का, अपघातग्रस्त कामगाराच्या उपचारांचा खर्च कोण उचलणार आणि त्याला नियमानुसार नुकसानभरपाई मिळणार का, याबाबत पुरवठा विभागाने स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, साखरखेर्डा गोदामातील दुर्घटनेची सखोल चौकशी करून गोदामातील पोत्यांच्या थप्प्यांची रचना, सुरक्षितता व्यवस्था आणि कामगारांसाठी असलेल्या सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.













