रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रायपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत ग्राहकांना बँकिंग सुविधांपेक्षा गैरसोयींचाच सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. दररोज बँकेत होणारी गर्दी आणि त्या तुलनेत अपुरी जागा यामुळे ग्राहकांना तासनतास उभे राहून बँकेच्या कामासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग ग्राहकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
बँकेच्या शाखेत ग्राहकांची संख्या मोठी असताना प्रतीक्षेसाठी पुरेशी जागा किंवा आसन व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी कोंडी होते. अनेक ग्राहकांना बँकेतील कामकाजासाठी बराच वेळ उभे राहावे लागते. त्यामुळे ग्राहकांची ही गैरसोय नेमकी कधी दूर होणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाळ्यात समस्या आणखी गंभीर….
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्राहकांची अडचण आणखी वाढली आहे. बाहेर पाऊस सुरू असल्याने ग्राहकांना शाखेबाहेर थांबणे शक्य होत नाही. दुसरीकडे, शाखेच्या आत आधीच जागा अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परिणामी ग्राहकांना उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नसल्याचे चित्र आहे.
ज्येष्ठ नागरिकांना दीर्घकाळ उभे राहणे त्रासदायक ठरत असतानाही त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रतीक्षा व्यवस्था किंवा पुरेशा खुर्च्या उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाचीही मागणी….
बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच लघुशंकेसाठी स्वच्छतागृहाची सुविधा असणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. मात्र, या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्राहकांची संख्या लक्षात घेता शाखेत तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सेंट्रल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन शाखेची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि ग्राहकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्राहकांच्या सुविधांसाठी ठोस उपाययोजनांची मागणी….
शाखेत पुरेशा खुर्च्या, स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष किंवा जागा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची प्याऊ तसेच स्वच्छतागृहाची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते आशिष जयस्वाल, दयाराम हनवते, विलास अहीर, काँग्रेस कार्यकर्ते अनुप अहीर, माजी सरपंच अभिमान घोलप, जगदीश चौथे, शमीम सौदागर यांच्यासह नागरिकांनी बँक प्रशासनाकडे केली आहे.
ग्राहकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता बँक प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.














