इसरूळ(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील रामनगर येथे बंद घराचा मागील दरवाजा फोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास दिगंबर भगत (रा. रामनगर, ता. चिखली) हे ७ ऑगस्ट रोजी पत्नीसह नातेवाईकांकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूच्या दरवाजातून आत प्रवेश केला.
दरम्यान, सकाळच्या सुमारास शेजारी नवनाथ बहुले यांनी भगत यांना फोन करून घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. चोरी झाल्याची शक्यता असल्याने भगत यांनी तातडीने घरी धाव घेतली.
घरी पोहोचल्यानंतर पाहणी केली असता, कपाटातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोथ, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर (जोड), दोन सोन्याच्या अंगठ्या आणि ३० हजार रुपये रोख असा एकूण अंदाजे ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी रामदास भगत यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सिद्धार्थ सोनकांबळे करीत आहेत.
चोरट्यांचा बंद घरांवर डोळा?
रामनगर परिसरात घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.













