लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) :लोणार तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थेट शाळेच्या आवारात व वर्गखोल्यांमध्ये शिरल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. पहिल्याच दमदार पावसात वर्गखोल्या जलमय झाल्याने विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाच्या पाण्यामुळे वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी बाकांभोवती पाणी साचल्याने नियमित अध्यापनात अडथळे निर्माण होत आहेत. काही विद्यार्थ्यांना पाण्यातूनच वर्गात प्रवेश करावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांनीही या परिस्थितीबाबत हतबलता व्यक्त करत, “बसायलाही जागा नाही… आता आम्ही शाळेत कसे शिकायचे?” असा सवाल उपस्थित केला आहे. शाळेच्या परिसरात पाणी साचल्याने संपूर्ण आवाराचे तलावात रूपांतर झाले असून शिक्षणासाठी आवश्यक असलेले वातावरणच बिघडले आहे.
स्थानिक ग्रामस्थ व पालकांच्या मते, मुख्य रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दरवर्षी हीच समस्या निर्माण होते. याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, शाळेतील ही समस्या त्वरित सोडवली नाही तर पालक, ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शिक्षणाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.














