Advertisement Advertisement

पेनटाकळी प्रकल्प ६५% तर कोराडी धरण ७०% भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर तालुक्यासह हिवरा आश्रम, बुलढाणा आणि साखरखेर्डा परिसरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेनटाकळी प्रकल्प आणि कोराडी धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप पिकांनाही मोठे जीवदान मिळाले आहे.

बुधवार आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळे पेनटाकळी प्रकल्पात ६५ टक्के, तर कोराडी धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, पेनटाकळी प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने प्रशासनाने पैनगंगा नदीकाठावरील दुधा, ब्रह्मपुरी, रायपूर, पेनटाकळी, नांद्रा धांडे, पाचला, भालेगाव, गोंडाळा, कंबरखेड, नेमतापूर, फडदापूर, मेहकर, सारंगपूर, अंत्री देशमुख, बोरी, सोनाटी, गणपूर तसेच इतर गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

तसेच कोराडी धरण ७० टक्के भरल्याने कोराडी नदीकाठावरील नागझरी, कल्याणा आणि परिसरातील गावांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पेनटाकळी प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश शिंदे तसेच कोराडी धरणाचे शाखा अभियंता गावित यांनी बुलडाणा कव्हरेज न्यूजशी बोलताना ही माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!