चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील शाहूनगर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बहुमजली निवासी इमारतीवरून खाली पडून ४७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२५ जुलै) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. वर्षा गुलाबराव चेके (वय ४७, रा. शाहूनगर, चिखली) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, शाहूनगर परिसरात एका खासगी विकासकाकडून बहुमजली निवासी प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पातील फ्लॅट आपल्या बहिणीसाठी खरेदी करण्याच्या उद्देशाने वर्षा चेके या घरकाम करणाऱ्या एका महिलेसह फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील फ्लॅटची पाहणी सुरू असताना त्या अचानक इमारतीवरून खाली पडल्याचे तेथे काम करणाऱ्या एका मजुराच्या निदर्शनास आले. घटनेनंतर बांधकामस्थळी एकच धावपळ उडाली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या मजूर व नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मृतक वर्षा चेके या शाहूनगर परिसरातील रहिवासी होत्या. त्यांचे पती गुलाबराव चेके हे लव्हाळा येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेमागील कारणाचा शोध सुरू..
वर्षा चेके या नेमक्या कोणत्या मजल्यावरून खाली पडल्या, अपघात कसा घडला किंवा त्यामागे अन्य कोणते कारण आहे का, याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे तसेच शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.













