बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने तसेच विदर्भ प्रभारी व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेनुसार या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
कार्यकारिणीत नरेश शेळके (दक्षिण) आणि प्रसेनजीत पाटील (उत्तर) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, कोषाध्यक्ष, प्रवक्ते, संघटक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अशा विविध पदांवर जिल्ह्यातील अनुभवी व नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
जिल्हा उपाध्यक्षपदी सदानंद तेजनकर, भगवानराव शेळके, पी. एम. जाधव, विनायकराव पडघान, आत्माराम कायंदे, गंगाधर जाधव, रियाज खान पठाण यांच्यासह अनेकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीसपदी शंतनू पाटील, नसीम बेग, विनायक राठोड, हाजी आलम कोटकर, डॉ. विकास मिसाळ, डॉ. प्रकाश शिंगणे यांच्यासह अनेकांना जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हा सचिव, कार्यकारिणी सदस्य, प्रवक्ते आणि संघटक पदांवरही विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा कोषाध्यक्षपदी अॅड. ए. रफिक मज्जित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, जळगाव जामोद, मोताळा, संग्रामपूर, शेगाव, खामगाव, नांदुरा आणि मलकापूर येथील तालुकाध्यक्ष व कार्याध्यक्षांची घोषणा करण्यात आली. तसेच शहराध्यक्ष आणि शहर कार्याध्यक्ष पदांवरही विविध शहरांतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय विदर्भ प्रभारी तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, नानाभाऊ कोकरे, माजी जिल्हाध्यक्ष साहेबराव सरदार, प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, भास्करराव काळे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ रायपुरे, बी. टी. जाधव, प्रदेश सचिव आफताब खान यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा कायम निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथस्तरापर्यंत पक्ष बळकट करण्याच्या उद्देशाने ही विस्तारित कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.












