Advertisement Advertisement

बिबट्या आला बिबट्या आला! बिबट्यानं पळसखेड दौलत शिवार गाजवलं; पोलिस-वन विभागाच्या संयुक्त मोहिमेत सुरक्षित जेरबंद….

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत शिवारात बिबट्याचा मुक्त संचार आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच चिखली पोलिस, बुलढाणा वन विभाग आणि रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अनेक तासांच्या शर्थीच्या संयुक्त मोहिमेनंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे जेरबंद केले.

माहितीनुसार, बिबट्या शिवारात फिरत असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अश्विनी गाडे, पोलीस अंमलदार जनार्धन इंगळे, राजेश मापारी, निलेश सावळे, सुनील केसकर आणि विशाल वायाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी सुरू केली. यावेळी पोलीस मित्र सोहेल यांनीही नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार श्वेता महाले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर बुलढाणा वन विभागाने यंत्रणा सक्रिय करत वनपाल बकाल, वनरक्षक आबासाहेब वायाळ, वनरक्षक आकाश शिंदे तसेच रेस्क्यू टीमचे संदीप मडावी आणि अमोल चव्हाण यांना घटनास्थळी रवाना केले.

पोलिस आणि वन विभागाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने परिसराची नाकेबंदी करून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. रेस्क्यू पथकाने काळजीपूर्वक सापळा रचत शोधमोहीम सुरू ठेवली. काही काळ चाललेल्या या थरारक मोहिमेनंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात यश आले.

यानंतर वन विभागाच्या पथकाने बिबट्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी हलविले असून, तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

बिबट्या पकडल्याची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी योग्य खबरदारी घेत नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत संपूर्ण बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!