Advertisement Advertisement

पावसाळ्यात वीजेपासून सावध राहा! विजेच्या धक्क्याने वर्षभरात ३५ जणांचा मृत्यू; महावितरणचे नागरिकांना आवाहन….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे विद्युत यंत्रणेवर ताण वाढत असून, तुटलेल्या वीजतारा, कोसळलेले वीज खांब, रोहित्रांतील बिघाड तसेच पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

    जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विजेच्या धक्क्यामुळे तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात तुटलेल्या वीजतारा, शेतातील विद्युत पंप तसेच ओल्या वातावरणात विद्युत उपकरणे निष्काळजीपणे हाताळल्याने अनेक अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

तुटलेली वीजतार दिसल्यास दूर राहा…

महावितरणने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात दिसणारी प्रत्येक तुटलेली वीजतार धोकादायक समजावी. वीज खांब, रोहित्र किंवा विद्युत तारा यांना स्पर्श करू नये. अशा प्रकारची घटना दिसल्यास तातडीने महावितरणला माहिती देऊन परिसरातील नागरिकांनाही सतर्क करावे.

घरातही घ्या विद्युत सुरक्षिततेची काळजी…

घरातील स्विच, प्लग, वायरिंग किंवा इतर विद्युत उपकरणे वापरताना हात कोरडे असावेत. ओलसर हाताने कोणतेही विद्युत उपकरण हाताळू नये. खराब स्विच, सैल वायर किंवा स्पार्किंग होत असल्यास त्वरित दुरुस्ती करून घ्यावी. तसेच घरातील अर्थिंगची व्यवस्था योग्य असल्याची खात्री करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

तारांवर कपडे वाळवणे धोकादायक…

विद्युत तारा किंवा केबलवर कपडे वाळत घालू नयेत. तसेच तारांवर दोरी, लोखंडी वस्तू किंवा अन्य साहित्य टांगू नये. तुटलेल्या तारांजवळ किंवा वीज खांब, रोहित्र परिसरात पाणी साचले असल्यास त्या ठिकाणी जाणे टाळावे, कारण पाण्यात विद्युत प्रवाह उतरलेला असू शकतो.

आपत्कालीन परिस्थितीत येथे संपर्क साधा…

तुटलेली वीजतार, वीज खांब कोसळणे, रोहित्रातील बिघाड किंवा इतर कोणतीही विद्युत आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास महावितरणच्या स्थानिक कार्यालयाशी किंवा २४x७ टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांक १९१२ वर तातडीने संपर्क साधावा. तसेच १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ या टोल-फ्री क्रमांकांवरही तक्रार नोंदविता येते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!