अमडापूर (राधेश्याम काळे:बुलडाणा कव्हरेज न्युज): डोंगरशेवली शिवारातील दरी-खोऱ्यात जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर अमडापूर पोलिसांनी गुरुवारी (९ जुलै) धडक कारवाई करत हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत हातभट्टी दारू, साहित्य आणि सडावा नष्ट करण्यात आला असून, दोन महिलांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस स्टेशन अमडापूरचे ठाणेदार जयसिंग राजपूत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने डोंगरशेवली शिवारातील जंगलात छापा टाकला. कारवाईदरम्यान रेखाबाई सुनील पवार आणि मंगलाबाई गणेश पवार डोंगरखंडाळा, ता. चिखली यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी रेखाबाई पवार यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा सुमारे ३,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर मंगलाबाई पवार यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा सुमारे ३,६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. छाप्यानंतर हातभट्टी, तयार दारू आणि सडावा जागीच नष्ट करण्यात आला.
ही कारवाई ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती चेके, पोलीस हवालदार बिलगे, पोलीस शिपाई चंद्रशेखर मुरडकर, दुर्गासिंग ठाकूर, रंजीत सरोदे, चालक चिंचोले आणि महिला अंमलदार वैशाली आराख यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी दोन्ही महिला आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती चेके पुढील तपास करीत आहेत.













