Advertisement Advertisement

शेतकऱ्यांचा संताप विधानभवनावर धडकला; शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सातबारा सोयाबीन कापूस विधानभवनावर फेकला…

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी विधानभवनासमोर आक्रमक आंदोलन छेडले. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी त्यांनी शेतकऱ्यांसह विधानभवनाच्या दिशेने मोर्चा वळवला.

आंदोलनादरम्यान तुपकर आणि त्यांच्या समर्थकांनी विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने फेकण्यात आल्या, तर सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. या प्रकारामुळे विधानभवन परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

या आंदोलनाची पार्श्वभूमी मागील महिन्यातील अन्नत्याग आंदोलनाशी जोडलेली आहे. १५ ते १९ जूनदरम्यान बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसह विविध शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णयाचा शब्द दिल्यानंतर तुपकर यांनी आंदोलन स्थगित केले होते.

मात्र, आश्वासनानंतरही कोणतीही बैठक न झाल्याचा आणि मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. गुरुवारी सकाळी ते शेतकऱ्यांसह अचानक विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना रोखले.

यानंतर मोठ्या पोलिस बंदोबस्तात रविकांत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे नेण्यात आले. या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा विधानभवनाच्या दारात पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!