Advertisement Advertisement

विहिरीत लपवलेल्या दुचाकी बाहेर काढून विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड…छत्रपती संभाजीनगर एलसीबीची गुप्त मोहीम ! २४ तासांच्या थरारक कारवाईत १५ चोरीच्या दुचाकी जप्त…

धाड (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धाड परिसरात राबविलेल्या गुप्त आणि धाडसी कारवाईत आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. २५ जूनच्या रात्री सुरू झालेली ही मोहीम २६ जूनच्या रात्रीपर्यंत अखंड सुरू होती. जवळपास २४ तास चाललेल्या या थरारक सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी तब्बल १५ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी करणारी टोळी चोरीच्या गाड्या गजानन फकीरा जाधव (रा. रांजणगाव) याच्यामार्फत धाड येथील समीर शेख याच्याकडे पोहोचवत होती. त्यानंतर धाड परिसरातील काही स्थानिक एजंटांच्या मदतीने या चोरीच्या दुचाकी अत्यंत कमी किमतीत सर्वसामान्य नागरिकांना विकल्या जात असल्याचे उघड झाले आहे. कमी दराचे आमिष दाखवून हा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एलसीबीने गुप्त सापळा रचून संपूर्ण रॅकेट उघडकीस आणले.

विहिरीत लपवायचे चोरीचे वाहन

या तपासादरम्यान टोळीच्या धक्कादायक कार्यपद्धतीचाही खुलासा झाला. संशयित चोरी केलेल्या दुचाकी गावालगतच्या एका विहिरीत पाण्यात बुडवून ठेवत होते, जेणेकरून पोलिसांना किंवा इतर कोणालाही त्यांचा संशय येऊ नये. ग्राहक मिळाल्यानंतरच विहिरीतून दुचाकी बाहेर काढून तिची विक्री केली जात होती. संशयितांच्या चौकशीनंतर पोलिसांनी विहिरीतूनही काही दुचाकी बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, या रॅकेटमधील आणखी आरोपी व चोरीच्या दुचाकींचा शोध घेतला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!