खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट कुऱ्हाडीच्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील वाडी येथे घडली. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून, खामगाव शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, दत्ता भास्कर जवंजाळ (वय ३७, रा. जुनी वाडी, ता. खामगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश भानुदास खोंड (वय ३०, रा. वाडी, ता. खामगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास वाडी येथील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली. फिर्यादीचा चुलत भाऊ नागेश मधुकर जवंजाळ हा घरातून बाहेर गेल्यानंतर बराच वेळ परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तो आरोपीच्या घराजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी तेथे पोहोचले.
यावेळी आरोपी मंगेश खोंड याच्या हातात लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड होती. दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून आरोपीने नागेश जवंजाळ यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले.
हल्ल्यानंतर आरोपीने फिर्यादी व जखमीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमी नागेश यांना तातडीने रिक्षाच्या सहाय्याने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गोंडाने करीत आहेत













