चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज):शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज दि. 15 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजेपासून बुलढाणा येथील महावितरण कार्यालयाजवळ, चिखली रोडवरील निवासस्थानासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
. जाहिरात 👆
तुपकरांच्या ‘आरपारच्या लढाई’च्या हाकेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून चिखली तालुक्यासह जिल्ह्यात शेतकरी आक्रमक होतांना दिसत असून शेलसुर,शेलोडी गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी कर्जमाफी च्या जाचक अटि असलेल्या शासन निर्णयाची होळी करत शासनाचा निषेध नोंदवला आहे.
‘अभी नही तो कभी नही’ – शेतकऱ्यांचा निर्धार
“बिनअट, बिनशर्त सरसकट कर्जमुक्ती, हक्काच्या पीक विम्यासाठी व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी” तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनस्थळी शेकडो शेतकरी तुपकरांना भेट देऊन पाठींबा देत आहेत.
आंदोलनाच्या धर्तीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकमुखी आवाज दिला आहे – “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, नाहीतर खुर्ची खाली करा” सरकारने यापुढे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये, अन्यथा येणाऱ्या काळात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
हक्क मिळवण्यासाठी एकत्र या -विनायक सरनाईक
तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला विविध शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांकडूनही पाठींबा जाहीर होत आहे. “शेतकऱ्यांनी आपला हक्क मिळवून घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे” असे आवाहन विनायक सरनाईक यांनी चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
‘अभी नही तो कभी नही’ – या निर्धाराने शेतकरी आता रस्त्यावर उतरला असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.तर तुपकरांची तब्येत ढासाळत जरी चालली असून हे आंदोलन उग्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.











